IntriKate Consulting LLP गोपनीयता सूचना

गोपनीयता सूचना

अंतिम अद्ययावत: 29 सप्टेंबर 2026

इंट्रिकेट कन्सल्टिंग एलएलपी या संकेतस्थळाद्वारे आणि ई-मेलद्वारे कोणती वैयक्तिक माहिती संकलित करते, ती का संकलित करते, आणि त्या माहितीबाबत आपण आम्हाला काय करण्यास सांगू शकता, हे या सूचनेत स्पष्ट केले आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 आणि त्याअंतर्गत केलेले नियम यांनुसार आम्ही वैयक्तिक माहिती हाताळतो. डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण अधिनियम, 2023 आणि डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियम, 2025 यांच्या तरतुदी जसजशा अंमलात येतील, तसतशी त्यांची पूर्तता व्हावी, या हेतूने ही सूचना तयार केली आहे.

आम्ही कोण आहोत

येथे वर्णन केलेल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करावी, हे इंट्रिकेट कन्सल्टिंग एलएलपी (“आम्ही”, “आम्हाला”) ठरवते. आमचे नोंदणीकृत कार्यालय आणि LLPIN प्रत्येक पृष्ठाच्या तळाशी दर्शवले आहेत. आपल्या वैयक्तिक माहितीविषयी कोणत्याही प्रश्नासाठी, खाली नमूद केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधा.

आम्ही काय संकलित करतो, आणि का

  • चौकशी: आपले नाव, संस्था, ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि संदेश — आपल्याला उत्तर देण्यासाठी, आणि आपण आमची नियुक्ती केल्यास, प्रस्ताव तयार करण्यासाठी.
  • नोकरीसाठी अर्ज: आपले स्वविवरणपत्र (CV) आणि कामाचा नमुना — आपल्या अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी.
  • सदस्यता: आपला ई-मेल पत्ता — आपण सदस्यता रद्द करेपर्यंत आमची अंतर्दृष्टी टिपणे आपल्याला पाठवण्यासाठी.
  • तांत्रिक माहिती: संकेतस्थळ सुरक्षित ठेवण्यासाठी आमचा होस्टिंग सेवा प्रदाता सर्व्हर लॉग नोंदवतो, उदा. IP पत्ता, ब्राउझरचा प्रकार, मागवलेली पृष्ठे आणि वेळ. आम्ही भेटींची एकत्रित आकडेवारी वापरतो, जिच्यावरून आपली ओळख पटत नाही.

कुकीज

हे संकेतस्थळ जाहिरातीसाठी किंवा मागोवा घेण्यासाठी (ट्रॅकिंग) कुकीज ठेवत नाही. आपण भाषा निवडल्यास, संकेतस्थळाला ती निवड लक्षात ठेवता यावी म्हणून ती आपल्या स्वतःच्या ब्राउझरमध्ये साठवली जाऊ शकते. ती आम्हाला पाठवली जात नाही.

आपली संमती

आपण आम्हाला पाठवलेल्या माहितीवर आम्ही आपल्या संमतीच्या आधारे, किंवा आपण ती एखाद्या नमूद प्रयोजनासाठी स्वेच्छेने दिली असल्यामुळे, प्रक्रिया करतो. खालील पत्त्यावर लिहून आपण कधीही आपली संमती मागे घेऊ शकता. संमती मागे घेणे हे संमती देण्याइतकेच सोपे आहे, आणि त्यामुळे आधीच झालेल्या प्रक्रियेवर परिणाम होत नाही.

आम्ही माहिती कोणाला देतो

आमच्या वतीने हे संकेतस्थळ आणि आमचा ई-मेल होस्ट करणाऱ्या सेवा प्रदात्यांनाच, आणि ती सेवा देण्यासाठी त्यांना आवश्यक असेल तेवढ्यापुरतीच, आम्ही वैयक्तिक माहिती देतो. आम्ही वैयक्तिक माहिती विकत नाही. कायद्याने आवश्यक असेल तेथे आम्ही ती प्रकट करू शकतो.

माहिती कोठे साठवली जाते

आमचे सेवा प्रदाते भारताबाहेरील सर्व्हरवर माहिती साठवू शकतात. असे कोणतेही हस्तांतरण भारतीय कायद्यानुसार केले जाते.

आम्ही माहिती किती काळ ठेवतो

  • ज्या चौकशीतून कार्यनियुक्ती होत नाही: 24 महिन्यांपर्यंत.
  • नोकरीसाठी अर्ज: 12 महिन्यांपर्यंत.
  • सदस्यता: आपण सदस्यता रद्द करेपर्यंत.
  • सर्व्हर लॉग: एक वर्ष, किंवा कायद्याने आवश्यक असल्यास त्याहून अधिक काळ.

आम्ही माहितीचे संरक्षण कसे करतो

प्रेषणादरम्यान माहिती कूटबद्ध केली जाते. माहितीचा प्रवेश भागीदार आणि आपल्या प्रकरणावर काम करणाऱ्या व्यक्तींपुरता मर्यादित आहे, आणि आमची खाती द्वि-घटक प्रमाणीकरणाने संरक्षित आहेत. एखाद्या सुरक्षा भंगाचा आपल्या माहितीवर परिणाम झाल्यास, कायद्याने आवश्यक असल्याप्रमाणे आम्ही आपल्याला आणि प्राधिकरणांना कळवू.

आपले अधिकार

आम्ही आपल्याविषयी धारण करत असलेल्या वैयक्तिक माहितीचा आणि तिचा वापर आम्ही कसा करतो याचा सारांश आपण आम्हाला मागू शकता; ती दुरुस्त, पूर्ण, अद्ययावत किंवा नष्ट करण्यास सांगू शकता; गाऱ्हाणे मांडू शकता; आणि आपला मृत्यू झाल्यास किंवा आपण असमर्थ झाल्यास हे अधिकार वापरण्यासाठी अन्य व्यक्तीचे नामनिर्देशन करू शकता. खालील पत्त्यावर लिहा. आम्ही 30 दिवसांच्या आत प्रतिसाद देऊ.

तक्रारी

कृपया कोणतीही तक्रार प्रथम आमच्याकडे नोंदवा. आमच्या प्रतिसादाने आपले समाधान न झाल्यास, आपण भारतीय डेटा संरक्षण मंडळाकडे दाद मागू शकता.

मुले

हे संकेतस्थळ मुलांना उद्देशून नाही, आणि 18 वर्षांखालील कोणाकडूनही आम्ही जाणीवपूर्वक वैयक्तिक माहिती संकलित करत नाही.

भाषा

ही सूचना इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये उपलब्ध आहे. पृष्ठाच्या वरच्या भागातील भाषा निवडक वापरा.

वैयक्तिक माहितीसंदर्भात संपर्क

हर्षल काटे, व्यवस्थापकीय भागीदार.

[email protected] · +91 72890 84928